राज्यसभेच्या ७ जागांची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या महाराष्ट्राच्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला (MVA) मिळणार आहे. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. यावेळी शिवसेनेला संधी देण्यात यावी अशी आग्रही भूमिका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मांडली आहे, या भुमिकेवरती ते ठाम आहेत. तर शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवावे अशीही काही नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. एकीकडे आदित्य ठाकरे ही जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी आग्रही असतानाच आता शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं की, काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा होते आहे, आमचं म्हणणं आहे की शरद पवार यांनी लढायला हवं अशी आमची भूमिका देखील आहे. मी आणि जयंत पाटील काँग्रेस सोबत बोलणार आहोत, यासोबतच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. प्रत्येक पक्ष दावा करत आहेत, मात्र आम्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत २ दिवसांत बोलणार आहोत. बारामती पोट निवडणूक लढायची की नाही याबाबत देखील आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. तर राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर पुढे कोण येईल असं वाटत नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.
शरद पवार आज मुंबईत येणार त्यानंतर त्यांना ब्रिच कॅन्डी रुग्णालयात जाणार तिथं काही टेस्ट करतील, मग सिव्हर ओक येथे दोन तीन दिवस आराम करतील. जयंत पाटील आज शरद पवार यांची दुपारी भेट घेतील त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट जयंत पाटील घेतील, शरद पवार यांनी राज्यसभा जागा लढवावी यासाठी भूमिका मांडतील अशी माहिती देखील समोर आली आहे.
ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही आहेत. मात्र, मविआकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते राज्यसभा निवडणूक लढणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आज त्यांच्याशी चर्चा करतील. त्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागून घेतला आहे.

Post a Comment