अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने (ACB) रंगेहाथ पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रतिमा डागाळली होती. लाचखोरीच्या या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अजित पवार यांच्या माघारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच मोठ्या कोंडीत सापडला आहे. हे प्रकरण पुढे करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून चिखलफेक सुरु आहे. अमोल मिटकरी वगळता पक्षाचा एकही बडा नेता नरहरी झिरवळ यांच्या समर्थनासाठी पुढे आला नव्हता. एकूणच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या अडचणीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घेतला आहे.
नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची सोमवारी संध्याकाळी सहा वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. नरहरी झिरवळ प्रकरणात नेमक काय झालं, याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य समजून घेणार आहेत. जेणेकरुन या प्रकरणात पुढे काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. याशिवाय, बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीबाबतदेखील चर्चा पार पडणार आहे. पुढील 15 दिवसांत प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Post a Comment