उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा करत याप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने करताना दिसत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेतली. रोहित पवारांनी तीनदा याबाबत प्रेझेंटेशन देऊन अनेक शंका उपस्थित केल्या. परंतु, यावर शरद पवार का बोलत नाहीत, असा प्रश्न शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. लोकमतच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांच्याकडून सातत्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट आहे का, शरद पवार यावर कधी बोलणार, असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, हो. १०० टक्के. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त देशात पसरल्यावर पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी ज्या गोष्टीचे निराकरण केले, त्यावरून शरद पवार यांच्यातील मुत्सद्दीपणा दिसून येतो. कारण, त्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी शंका व्यक्त केली असती, तर काय झाले असते, असा प्रतिप्रश्न अमोल कोल्हे यांनी केला. अनेक प्रश्न निर्माण होत गेले, तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच दादांवर प्रेम करणारा अफाट जनसागर उसळलेला होता. त्यामुळे तेव्हा तशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. आता रोहित पवार जी भूमिका मांडत आहेत, ती १०० टक्के जे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत, जी घटना घडली, त्यावरील ती पहिली प्रतिक्रिया आहे. ती पहिली प्रतिक्रिया आम्हाला सगळ्यांना शॉक देणारी आहे. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत गेले, तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संविधानिक पदावर लीडर ऑफ हाऊस म्हणून सुप्रिया सुळे यांचे म्हणणे हेच आहे की, जे रोहित पवारांनी प्रश्न मांडले आहेत किंवा सरकार जी काही चौकशी करत आहे, त्या चौकशीचा अहवाल वाचल्याशिवाय, तो प्रमाणित केल्याशिवाय मी काही बोलू शकणार नाही. रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Post a Comment