कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो;
अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांचा वचक होता. आता त्यांच्या निधनानंतर आपण सुनेत्रा पवार यांना कंट्रोल करु, या भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहीजण आहेत. पण सुनेत्रा काकी (Sunetra Pawar) या एक सक्षम महिला आहेत. थोड्या दिवसांनी या नेत्यांना त्यांची ताकद काय आहे ते कळेल. नेता पार्टी कसा चालवतो, हे कळेल. त्यामुळे अजितदादा गटातील चार नेत्यांनी सांभाळून राहावे, असा इशारा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. काल एक महाशय बोलले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन पर्व सुरु झाले आहे. पण अजितपर्व कधी संपणार नाही. लोकांच्या मनात दादांबद्दल प्रेम कायम राहील. तसेच त्यांच्या अपघाताविषयी लोकांच्या मनात शंका आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
अजितदादा पक्षातील जे चार लोक आहेत, ते फक्त विलीनीकरणाच्या विषयाची चर्चा घडवून आणतात. कारण त्यांना स्वत:चं महत्त्व टिकवून ठेवायचे आहे. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे स्टेजवर सुनेत्रा काकींशी वागत असताना इतर गोष्टीत सांभाळून वागा, महाराष्ट्र बघतोय. अजितदादांचा वचक काय असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. अजितदादांचं कार्यकर्ते आणि आमदारांवर प्रेम होते. पण हे जे चार नेते आहेत, त्यांच्यावर अजितदादांचा वचक होता. कालच्या कार्यक्रमात जयने कुठे बसायचे ही जागा ठरवणारेही हे नेतेच होते. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी त्यांना ओढते, हे बघून आम्हाला वाईट वाटले. आम्ही याविषयी बोललो तर आम्ही राजकारण करतो, असे आरोप केले जातात, असे रोहित पवार यांनी म्हटले
मला सुनेत्रा काकींविषयी आदर आहे, त्या मोठ्या नेत्या आहेत. त्या अजितदादांसारखं काम करतील, हा विश्वास आहे. इतर नेत्यांनि त्यांच्याशी बोलताना सांभाळून वागावं आणि बोलावं. मी काल सुनेत्रा काकींचं भाषण ऐकलं, त्यांनी चांगले मुद्दे मांडले. बाकीच्यांच्या भाषणात ऐकण्यासारखे काही नव्हते, पूर्वीही त्यांच्या भाषणांमध्ये काही नसायचे, त्यामध्ये महत्त्वाचं काही नसते. काल अजितदादांच्या पक्षाच्या कार्यक्रमात काय घडलं, हे माहिती नाही. पण सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. त्या पवार कुटुंबाचा घटक आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलू शकतात, प्रश्नांना सामोऱ्या जाऊ शकतात. कोणाला वाटत असेल आपण अजितदादांना कंट्रोल करु शकत नव्हतो, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करु. तर ते भ्रमात आहेत. थोड्याच दिवसांनी त्यांची ताकद कळेल, असे रोहित पवार यांनी म्हटले..

Post a Comment