राजकीय वर्तुळात आजचा शनिवार मानहानीच्या खटल्यांमुळे विशेष चर्चेत राहिला. एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भिवंडी न्यायालयात हजर झाले, तर दुसऱ्या बाजूला मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यातील अब्रुनुकसानीचा वाद मिटला. त्याचवेळी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या वक्तव्यावरून शायना एन सी (Shaina NC) यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात या तिन्ही घडामोडींची जोरदार चर्चा रंगली.
भिवंडी कोर्टात राहुल गांधी
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी सभेत “आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली” असे विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांचे जामीनदार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. मात्र डिसेंबर 2025 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर न्यायालयाने नवीन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी न्यायालयात राहुल गांधी यांचा जामीन स्वीकारला. न्यायालयाने जामीनपत्र मंजूर केल्याने पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला.

Post a Comment