मोठी बातमी! मुंबईत भाजपचा महापौर बसल्यानंतरही शिंदेंची मोठी खेळी, सव्वा वर्षासाठी शिवसेनेला महापौरपद मिळणार!
महायुतीच्या रितू तावडे महापौर बनल्या आहेत. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर मुंबईची महापौर कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या शर्यतीमध्ये तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचा समावेश होता. मात्र, अखेरच्या क्षणी रितू तावडे यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली. मात्र, आता त्यांचं हे पद 5 वर्षातील सत्ता काळात सव्वा वर्षासाठी त्यांना सोडावं लागणार आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (Mumbai) महानगर पालिकेच्या महापौरपदावरून (Mayor) महायुतीत एकमत झालं असून मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेलाही सव्वा वर्षे महापौरपद मिळणार आहे. सत्तेच्या काळातील 5 वर्षांपैकी कधीही सव्वा वर्षे शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर मुंबईत असणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर महापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात 29 जानेवारी रोजी बैठक पार पडल्यानंतर हा फॉर्म्युला फिक्स झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, भाजपच्या महापौरांना पायउतार व्हावं लागून शिंदेंच्या शिवसेनेचा महौपार सव्वा वर्षासाठी विराजमान होईल. मात्र, तो नगरसेवक कोण असेल हे तेव्हाच समजणार आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत यंदा प्रथमच भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाने युती करत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. मात्र, युतीला बहुमत मिळवण्यात अपयश आलं. तर, राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 6 जागा जिंकता आल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या तर, शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकत महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्याने भाजप महायुतीची सत्ता महापालिकेत स्थापन झाली. मात्र, महापौरपदाची मागणी शिवसेनेकडून होत असल्याने महापौर निवडीला उशीर होत होता. अखेर, दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी शिवसेनेसाठी सव्वा वर्षाचं महापौरपद निश्चित केल्याची माहिती आहे.
मुंबई आणि इतर महानगरपालिकेत महायुतीचा तिढा सुटत नसल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली आणि मुंबईसह इतर महानगर पालिकेचा तिढा सुटला. याच बैठकीत मुंबई महानगर पालिकेत सव्वा वर्षावर महापौरपदाचे वाटप करण्यावर दोन्ही पक्षात एकमत झाल्याची माहिती आहे. सोबतच समितीच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरला. महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षाच्या समंजसपणाच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला.

Post a Comment