भारत आणि अमेरिकेत हंगामी व्यापारी करार झाला आहे. त्यानुसार अमेरिकेने याआधी भारतावर असलेले टॅरिफ कमी करून 50 टक्क्यांवरून 18 टक्के केले. या करारानुसार भारताला रशियाकडून तेल खरेदी करता येणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर जेव्हा भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या व्यापारी करारात काय घडले याची माहिती दिली.
शनिवारी (7 फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत पीयूष गोयल यांना रशियाकडून तेल खरेदीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
गोयल म्हणाले, "मी अनेक वेळा म्हटले आहे की, या प्रश्नाचे उत्तर परराष्ट्र मंत्रालय देईल."
5 फेब्रुवारीला जेव्हा ANI या वृत्तसंस्थेने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना ट्रेड डीलच्या तपशीलाबाबत विचारले तेव्हा त्यांनी यावर फारसे भाष्य करणे टाळले.
तेव्हा ते म्हणाले होते, "माझ्याशी याबाबतीत थेट बोलणे झाले नाही. ही बाब वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर ट्रेड डील जाहीर करण्यात आली. ट्रेड डीलमध्ये तपशील काय असेल हे ठरवण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे."

إرسال تعليق